< स्तोत्रसंहिता 92 >

1 शब्बाथ दिवसाचे स्तोत्र परमेश्वराची उपकारस्तुती करणे आणि हे परात्परा, तुझ्या नावाला स्तुती गाणे ही चांगली गोष्ट आहे. 2 सकाळी तुझे वात्सल्य, आणि प्रत्येकरात्री तुझ्या सत्यतेबद्दल निवेदन करणे. 3 दहा तारांचे वाद्य, वीणेवर आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले आहे. 4 कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृत्यांविषयी मी आनंदाने गाईन. 5 हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती महान आहेत, तुझे विचार फार गहन आहेत. 6 पशुतुल्य मनुष्यास ते कळत नाहीत, किंवा मूर्खाला ती समजत नाहीत, 7 दुष्ट गवताप्रमाणे उगवले, आणि सर्व वाईट करणारे भरभराटीस आले; तरीही त्यांचा कायमचा शेवटचा नाश ठरलेला आहे. 8 परंतु हे परमेश्वरा, तू तर सदासर्वकाळ राज्य करशील. 9 हे परमेश्वरा, खरोखर, तुझ्या शत्रूंकडे पाहा; सर्व वाईट करणारे विखरले आहेत. 10 १० पण तू माझे शिंग रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उंच केले आहेस; मला ताज्या तेलाचा अभिषेक झाला आहे. 11 ११ माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा नाश पाहिला आहे; जे दुष्कर्मी माझ्यावर उठतात त्यांच्याविषयी माझ्या कानांनी ऐकले आहे. 12 १२ नितीमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल. 13 १३ जे परमेश्वराच्या घरात लावलेल्या वृक्षासारखे आहेत; ते आपल्या देवाच्या अंगणात झपाट्याने वाढतील. 14 १४ वृद्धपणातही ते फळ देत राहतील; ते टवटवीत आणि हिरवे राहतील. 15 १५ हे यासाठी की, परमेश्वर सरळ आहे हे त्यांनी जाहीर करावे; तो माझा खडक आहे, आणि त्याच्याठायी काहीच अन्याय नाही.

< स्तोत्रसंहिता 92 >