< स्तोत्रसंहिता 76 >

1 मुख्य संगीतकारासाठी, तंतुवाद्यावरचे आसाफाचे स्तोत्र गीत. यहूदात देव कळाला आहे, इस्राएलामध्ये त्याचे नाव थोर आहे. 2 शालेममध्ये त्याचा मंडप आहे, आणि सियोनेत त्याची गुहा आहे. 3 तेथे त्याने धनुष्य बाण, ढाली, तलवारी आणि इतर शस्त्रे मोडून टाकली आहेत. 4 तू जेथे शत्रूंना ठार केलेस, त्या डोंगरावरून उतरताना तू तेजस्वी चमकतोस आणि तुझे वैभव प्रकट करतोस. 5 जे हृदयाचे धाडसी ते लुटले गेले आहेत, ते झोपी गेले आहेत, सर्व योद्धे असहाय्य झाले आहेत. 6 हे याकोबाच्या देवा, तुझ्या युद्धाच्या आरोळीने, रथ आणि घोडे दोन्हीपण झोपी गेलेत आहेत. 7 तू, होय तुच, ज्याचे भय धरावे असा आहेस. असा कोण आहे कि तू रागावतोस तेव्हा तुझ्या दृष्टीस उभा राहील? 8 तुझा न्याय आकाशातून आला, आणि पृथ्वी भयभित व नि: शब्द झाली. 9 देवा, तू, पृथ्वीवरील खिन्न झालेल्यांना तारायला, न्याय अमलांत आणण्यास उठला आहे. 10 १० खचित त्या लोकांविषयी तुझा क्रोधित न्याय, तुला स्तुती मिळवून देईल. तुझा क्रोध तू पूर्णपणे प्रगट केला आहे. 11 ११ परमेश्वर तुमच्या देवाला नवस करून फेडा, ज्याचे भय धरणे योग्य आहे, जे तुम्ही त्याच्या सभोवती आहात, त्यास भेटी आणा. 12 १२ तो अधिकाऱ्यांच्या आत्म्याला नम्र करतो. पृथ्वीच्या राजांना तो भयावह असा आहे.

< स्तोत्रसंहिता 76 >