< स्तोत्रसंहिता 63 >

1 दाविदाचे स्तोत्र हे देवा, तू माझा देव आहेस; मी कळकळीने तुझा शोध घेईन; शुष्क आणि रूक्ष आणि निर्जल ठिकाणी माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे; माझा देहही तुझ्यासाठी आसुसला आहे. 2 म्हणून मी तुझे सामर्थ्य आणि गौरव पाहण्यासाठी मी आपली दृष्टी पवित्र मंदिराकडे लावली आहे. 3 कारण तुझी कराराची विश्वसनियता ही जीवनापेक्षा उत्तम आहे; माझे ओठ तुझी स्तुती करतील. 4 म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला धन्यवाद देईन; मी आपले हात तुझ्या नावात उंच करीन. 5 माझा जीव मज्जेने आणि चरबीने व्हावा तसा तृप्त होईल; माझे तोंड आनंदी ओठाने तुझी स्तुती करतील. 6 मी आपल्या अंथरुणावर तुझ्याविषयी विचार करतो आणि रात्रीच्या समयी त्यावर मनन करतो. 7 कारण तू माझे सहाय्य आहे, आणि मी तुझ्या पंखाच्या सावलीत आनंदी आहे. 8 माझा जीव तुला चिकटून राहतो; तुझा उजवा हात मला आधार देतो. 9 पण जे माझ्या जिवाचा नाश करण्याचा शोध घेतात ते पृथ्वीच्या खालच्या भागात जातील. 10 १० त्यांना तलवारीच्या अधिकारात दिले जाईल; त्यांना कोल्ह्यांचा वाटा म्हणून देतील. 11 ११ परंतु राजा देवाच्या ठायी जल्लोष करेल; जो कोणी त्याची शपथ घेईल तो त्याजवर गर्व करेल, पण जे कोणी खोटे बोलतात त्यांचे तोंड बंद होईल.

< स्तोत्रसंहिता 63 >