< स्तोत्रसंहिता 31 >

1 मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तुझ्यामध्ये मी आश्रय धरिला आहे, कधीच माझी निराशा होऊ देऊ नकोस. तुझ्या न्यायात मला वाचव. 2 माझे ऐक, त्वरीत मला वाचव, माझ्या आश्रयाचा खडक हो. माझा तारणारा बळकट दुर्ग असा हो. 3 कारण तू माझा खडक आणि माझा दुर्ग आहेस, तर तुझ्या नामास्तव मला मार्गदर्शन कर आणि मला चालव. 4 त्यांनी गुप्तपणे रचलेल्या सापळ्यातून तू मला उपटून बाहेर काढ. कारण तू माझा आश्रय आहे. 5 मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, हे परमेश्वरा, सत्याच्या देवा, तू मला खंडून घेतले आहे. 6 जे निरुपयोगी मूर्तींची सेवा करतात, त्यांचा मी तिरस्कार करतो. परंतु मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो. 7 तुझ्या प्रेमदयेमध्ये मी आनंद आणि हर्ष करीन, कारण तू माझे दु: ख पाहिले आहेस. 8 तू मला माझ्या शत्रूंच्या हाती सोपवून दिले नाहीस. तू माझा पाय खुल्या विस्तीर्ण जागेत स्थिर केला आहे. 9 परमेश्वरा, माझ्यावर दया कर, कारण मी दु: खात आहे. माझे डोळे, माझा जीव, माझ्या देहासह क्षीण झाला आहे. 10 १० कारण माझे आयुष्य दु: खात आणि कण्हण्यात माझी वर्षे गेली आहेत. माझ्या पापांमुळे माझी शक्ती क्षीण झाली आहेत, आणि माझी हाडे झिजली आहेत. 11 ११ माझ्या शत्रूंमुळे लोक माझा तिरस्कार करतात माझ्या शेजाऱ्यास माझी परिस्थिती भयावह आहे, आणि जे मला ओखळतात त्यांना मी भय असा झालो आहे. 12 १२ मृत पावलेल्या मनुष्यासारखा मी झालो आहे, ज्याची कोणी आठवण करत नाही. मी फुटलेल्या भांड्यासारखा झालो आहे. 13 १३ कारण पुष्कळांनी केलीली निंदा मी ऐकली आहे, प्रत्येक बाजूनी भयावह बातमी आहे, ते माझ्याविरुध्द कट करत आहेत. 14 १४ परंतु परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे. तूच माझा देव आहेस, असे मी म्हणतो. 15 १५ माझे वेळ तुझ्या हातात आहे. मला माझ्या शत्रूंच्या आणि जे माझा पाठलाग करतात त्यांच्या हातातून सोडव. 16 १६ तुझ्या सेवकावर तुझ्या मुखाचा प्रकाश चमकू दे. तुझ्या प्रेमदयेत मला तार. 17 १७ परमेश्वरा, मला निराश होऊ देऊ नकोस, कारण मी तुला हाक मारतो, दुष्ट निराश केला जावो, मृतलोकांत तो निःशब्द होवो. (Sheol h7585) 18 १८ खोटे बोलणारे ओठ शांत केले जावोत, जसे ते नितीमानांच्याविरूद्ध असत्य आणि तिरस्काराने उद्धटपणे बोलतात. 19 १९ जे तुझा आदर बाळगतात त्यांच्यासाठी तू आपला थोर चांगूलपणा जपून ठेवला आहे, जे तुझ्यामध्ये आश्रय घेतात त्यांच्याकरिता तू सर्व मानवजाती समोर घडवून आणतोस. 20 २० त्यांना आपल्या उपस्थितीच्या आश्रयात तू मनुष्याच्या कटापासून लपवशील. हिंसक जीभेपासून तू त्यांना मंडपात लपवशील. 21 २१ परमेश्वर धन्यवादित असो! कारण त्याने बळकट नगरात आपली आश्चर्यकारक प्रेमदया दाखवली आहे. 22 २२ मी घाईत म्हणालो, मी तुझ्या नजरेसमोरून छेदून टाकलो आहे, तरी तू माझी मदतीची विनंती ऐकली, जेव्हा मी तुझ्याकडे आरोळी केली. 23 २३ अहो सर्व परमेश्वराच्या मागे चालणाऱ्यांनो, त्याच्यावर प्रीती करा. कारण परमेश्वर विश्वासू लोकांचे रक्षण करतो. परंतु तो गर्विष्ठ्यांची परत फेड करतो. 24 २४ जे तुम्ही परमेश्वरावर विश्वास करता, बलवान व धैर्यवान व्हा.

< स्तोत्रसंहिता 31 >