< स्तोत्रसंहिता 147 >

1 परमेश्वराची स्तुती करा, कारण आमच्या देवाची स्तुती गाणे चांगले आहे; ते आनंददायक आहे व स्तुती करणे उचित आहे. 2 परमेश्वर यरूशलेम पुन्हा बांधतो; तो इस्राएलाच्या विखुरलेल्या लोकांस एकत्र करतो. 3 तो भग्नहृदयी जनांना बरे करतो, आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो. 4 तो ताऱ्यांची मोजणी करतो; तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो. 5 आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे; त्याची बुद्धी मोजू शकत नाही. 6 परमेश्वर जाचलेल्यास उंचावतो; तो वाईटांना खाली धुळीस मिळवतो. 7 गाणे गाऊन परमेश्वराची उपकारस्तुती करा. वीणेवर आमच्या देवाचे स्तुतीगान करा. 8 तो ढगांनी आकाश झाकून टाकतो, आणि पृथ्वीसाठी पाऊस तयार करतो, तो डोंगरावर गवत उगवतो. 9 तो प्राण्यांना आणि जेव्हा कावळ्यांची पिल्ले कावकाव करतात त्यांना अन्न देतो. 10 १० घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही; मनुष्याच्या शक्तीमान पायांत तो आनंद मानत नाही. 11 ११ जे परमेश्वराचा आदर करतात, जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो. 12 १२ हे यरूशलेमे, परमेश्वराची स्तुती कर; हे सियोने तू आपल्या देवाची स्तुती कर. 13 १३ कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत; त्याने तुझ्यामध्ये तुझी लेकरे आशीर्वादित केली आहेत. 14 १४ तो तुझ्या सीमांच्या आत भरभराट आणतो; तो तुला उत्कृष्ट गव्हाने तृप्त करतो. 15 १५ तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो. 16 १६ तो लोकरीसारखे बर्फ पसरतो; तो राखेसारखे दवाचे कण विखरतो. 17 १७ तो आपल्या गारांचा बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो; त्याने पाठवलेल्या गारठ्यापुढे कोण टिकेल? 18 १८ तो आपली आज्ञा पाठवून त्यांना वितळवितो; तो आपला वारा वाहवितो व पाणी वाहू लागते. 19 १९ त्याने याकोबाला आपले वचन, इस्राएलाला आपले नियम व निर्णय सांगितले. 20 २० त्याने हे दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रासाठी केले नाही; आणि त्यांनी त्याचे निर्णय जाणले नाहीत. परमेश्वराची स्तुती करा.

< स्तोत्रसंहिता 147 >