< स्तोत्रसंहिता 137 >

1 आम्ही बाबेलाच्या नद्यांजवळ खाली बसलो; आणि जेव्हा आम्ही सियोनेविषयी विचार केला तेव्हा रडलो. 2 तेथील वाळुंजावर आम्ही आमच्या वीणा टांगल्या. 3 तेथे आम्हास पकडणाऱ्यांनी आम्हास गाणी गावयाला सांगितले आणि आमची थट्टा करणाऱ्यांनी आम्ही त्यांच्यासाठी करमणूक करावी म्हणून आम्हांस म्हणाले, सीयोनाच्या गाण्यांतले एखादे गाणे आम्हांला गाऊन दाखवा. 4 परक्या देशात आम्ही परमेश्वराचे गाणे कसे गावे? 5 हे यरूशलेमे, मी जर तुला विसरलो, तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो. 6 जर मी तुला विसरलो, जर मी यरूशलेमेला आपल्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानले नाही तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. 7 हे परमेश्वरा, अदोमाविरूद्ध यरूशलेमेच्या त्या दिवसाची आठवण कर, ते म्हणाले, ती पाडून टाका, पायापर्यंत पाडून टाका. 8 हे बाबेलाच्या कन्ये, तू लवकरच ओसाड पडणार आहेस, कारण जसे तू आम्हास केले तसे, जो तुला परत करील तो आशीर्वादित आहे. 9 जो तुझी बालके घेऊन त्यांना खडकावर आपटून ठार मारतो तो आशीर्वादित होईल.

< स्तोत्रसंहिता 137 >