< स्तोत्रसंहिता 126 >

1 सीयोनेतून धरून नेलेल्यांना परमेश्वराने माघारी आणले, तेव्हा आम्हास स्वप्नासारखे वाटले. 2 मग आमचे मुख हास्याने, आणि आमची जीभ गायनाने भरली. नंतर ते राष्ट्रांमध्ये म्हणू लागले; परमेश्वराने ह्यांच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत. 3 परमेश्वराने आमच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत; आम्ही किती हर्षित झालो आहोत! 4 परमेश्वरा, नेगेब येथील प्रवाहाप्रमाणे आम्हास बंदिवासातून परत आण. 5 जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतील ते हर्षाने आरोळी मारून कापणी करतील. 6 जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो, तो पुन्हा हर्षाने आरोळी मारून आपल्या पेंढ्या आपल्याबरोबर घेऊन येईल.

< स्तोत्रसंहिता 126 >