< स्तोत्रसंहिता 115 >

1 हे परमेश्वरा, आमचे नको. आमचे नको, तर आपल्या नावाचा सन्मान कर, कारण तू दयाळू आणि सत्य आहेस. 2 ह्यांचा देव कोठे आहे, असे राष्ट्रांनी का म्हणावे? 3 आमचा देव स्वर्गात आहे; त्यास जे आवडते ते तो करतो. 4 राष्ट्रांच्या मूर्ती सोन्याच्या व रुप्याच्या आहेत. त्या मनुष्यांच्या हातचे काम आहेत. 5 त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत, पण त्यांना बघता येत नाही. 6 त्यांना कान आहेत, पण त्यांना ऐकू येत नाही, त्यांना नाक आहे, पण त्यांना वास घेता येत नाही. 7 त्यांना हात आहेत, पण त्यांना स्पर्श करता येत नाही. त्यांना पाय आहेत पण त्या चालू शकत नाही; किंवा त्यांच्या मुखाने त्यांना बोलता येत नाही. 8 जे त्यांना बनवितात त्यांच्याप्रमाणेच, त्यांच्यावर भरवसा ठेवणारा प्रत्येकजन आहे. 9 हे इस्राएला, परमेश्वरावर विश्वास ठेव. तो त्यांचे सहाय्य आणि ढाल आहे. 10 १० हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वरावर विश्वास ठेव; तोच त्याचे सहाय्य आणि ढाल आहे. 11 ११ अहो परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा; तोच त्यांचे सहाय्य आणि ढाल आहे. 12 १२ परमेश्वराने आमची दखल घेतली आहे आणि आम्हास आशीर्वाद देईल. तो इस्राएलाच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल. तो अहरोनाच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल. 13 १३ जे परमेश्वराचा आदर करतात, त्या तरुण आणि वृद्ध या दोघांना तो आशीर्वाद देईल. 14 १४ परमेश्वर तुम्हास अधिकाधिक वाढवो, तो तुमची आणि तुमच्या वंशजांची वाढ करो. 15 १५ आकाश व पृथ्वी ही निर्माण करणाऱ्या परमेश्वराचा तुम्हास आशीर्वाद असो. 16 १६ स्वर्ग तर परमेश्वराचा आहे; पण त्यांने मानवजातीला पृथ्वी दिली आहे. 17 १७ मरण पावलेले म्हणजे निवांतस्थानी उतरलेले कोणीहि परमेश्वराची स्तुती करीत नाहीत. 18 १८ पण आम्ही आता आणि सदासर्वकाळ परमेश्वरास धन्यवाद देत राहू. परमेश्वराची स्तुती करा.

< स्तोत्रसंहिता 115 >