< इब्री 13 >

1 बंधुजनांवरील प्रीती निरंतर राहो. 2 लोकांचा पाहुणचार करण्याचे विसरू नका. असे करण्याने काहींनी त्यांच्या नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे. 3 तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर तुरुंगात होता असे समजून जे तुरुंगात आहेत त्यांची आठवण करा. तुम्हीही शरीरात असल्याने जे दुःख भोगीत आहेत त्यांची आठवण ठेवा. 4 सर्वांनी लग्नाचा आदर करावा व अंथरूण निर्दोष असावे कारण जे व्यभिचारी व जारकर्मी आहेत अशा लोकांचा देव न्याय करील. 5 आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यामध्येच समाधान माना कारण देवाने असे म्हणले आहे, “मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही” 6 म्हणून आपण धैर्याने म्हणू शकतो, “देव माझा सहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?” 7 ज्यांनी तुम्हास देवाचे वचन दिले त्या पुढाऱ्यांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनातील आचार पाहा व त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. 8 येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. (aiōn g165) 9 विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका कारण ज्यांकडून आचणाऱ्यांना लाभ नाही अशा अन्नाच्या विधीने नव्हे, तर देवाच्या कृपेने आपली अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले. 10 १० ज्या वेदीवरील अन्न खाण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार मंडपात सेवा करणाऱ्यांनाही नाही, अशी वेदी आपल्याकडे आहे. 11 ११ यहूदी मुख्य याजक प्राण्यांचे रक्त परमपवित्रस्थानात पापाचे अर्पण म्हणून घेऊन जातात. परंतु केवळ प्राण्यांची शरीरे छावणीच्या बाहेर नेऊन जाळतात. 12 १२ म्हणून येशूने सुद्धा स्वतःच्या रक्ताने लोकांस पवित्र करावे यासाठी नगराच्या वेशीबाहेर मरण सोसले, 13 १३ म्हणून आपण छावणीच्या बाहेर जाऊ आणि येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ. 14 १४ कारण स्थायिक असे नगर आपल्याला येथे नाही तरी भविष्यकाळात येणारे जे नगर आहे त्याच्याकडे आपण पाहत आहोत. 15 १५ म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या “ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण येशूद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.” 16 १६ आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो. 17 १७ आपल्या अधीकाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा. ज्यांना हिशोब द्यावयाचा असतो त्यांच्याप्रमाणे तुमच्या जीवासंबंधाने ते जागरूक असतात, त्यांच्या आज्ञा पाळा यासाठी की, त्यांनी त्यांचे काम दुःखाने न करता आनंदाने करावे. 18 १८ आमच्यासाठी प्रार्थना करा. आमची सद्सदविवेकबुद्धी शुद्ध आहे याविषयी आमची खात्री आहे आणि सर्वबाबतीत जे नेहमी बरोबर आहे तसेच सदैव वागत रहावे अशी आमची इच्छा आहे. 19 १९ मी तुम्हास विनंती करतो की, देवाने मला लवकरच तुमच्याकडे परत पाठवावे म्हणून कळकळीने प्रार्थना करा. 20 २० ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा मेंढपाळ, आपला प्रभू येशू ख्रिस्त याला रक्ताच्या सर्वकाळच्या नव्या कराराद्वारे उठवले. (aiōnios g166) 21 २१ त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हास चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यास संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. त्यास सदासर्वकाळ गौरव असो. आमेन. (aiōn g165) 22 २२ बंधुजनहो, हा जो बोधपर संदेश मी थोडक्यात लिहिला आहे, तो धीर धरून ऐका अशी विनंती तुम्हास करतो. 23 २३ आपला बंधू तीमथ्य हा तुरुंगातून सुटला आहे. जर तो लवकर माझ्याकडे आला, तर जेव्हा मी तुम्हास भेटायला येईन तेव्हा तो मजकडे येईल. 24 २४ तुमच्या सर्व पुढाऱ्यांना व देवाच्या सर्व पवित्रजणांना सलाम सांगा, इटली येथील विश्वास ठेवणारे लोक तुम्हास सलाम सांगतात. 25 २५ देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.

< इब्री 13 >