< हबक्कूक 2 >

1 मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहिन आणि बुरुजावर पहारा करीन, आणि तो मला काय म्हणेल व माझ्या तक्रारीपासून मी कसा वळेन ते लक्षपूर्वक पाहीन. 2 परमेश्वराने मला उत्तर दिले आणि म्हटले, “मी तुला जो दृष्टांत दाखवतो, तो स्पष्टपणे पाट्यांवर लिहून ठेव अशासाठी की जो कोणी ते वाचतो त्याने धावावे! 3 कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी अजून राखून ठेवला आहे, शेवटी तो बोलणार व फसवणार नाही, जरी त्यांने विलंब केला तरी, त्याची वाट पाहा! खचित तो येणारच आणि थांबणार नाही! 4 पाहा! मनुष्याचा आत्मा गर्विष्ठ झाला आहे, आणि स्वत: च्या ठायीच तो सरळ नाही, परंतू न्यायी आपल्या विश्वासाने वाचेल. 5 कारण द्राक्षरस तर विश्वासघात करणारा आहे, तो उन्मत्त तरूण पुरुष आहे आणि घरी राहत नाही. परंतू तो कबरेसारख्या आपल्या इच्छा वाढवतो, तो मृत्यूसारखा असतो, तो कधीच तृप्त होत नाही. तो आपल्याजवळ प्रत्येक राष्ट्र एकत्र करतो आणि आपल्यासाठी सर्व लोकांस एकत्र करतो. (Sheol h7585) 6 सर्वच लोक त्याच्या विरुद्ध बोधकथा घेणार नाहीत काय, आणि त्यास म्हणीने टोमणे मारतील व म्हणतील. जो आपले नाही ते वाढवतो, त्यास हाय हाय! कारण किती वेळ तू घेतलेल्या प्रतिज्ञांचा बोजा वाढवशील? 7 तुला भेवाडणारे व तुझ्यावर कडक टीका करणारे असे अचानक उठणार नाहीत काय? तू त्यांच्यासाठी बली असा होशील. 8 कारण तू पुष्कळ राष्ट्रे लुटली आहेत, म्हणून त्या लोकांतले उरलेले तुला लुटतील, ते अशासाठी की, मनुष्याच्या रक्तामुळे, देश व गावे यांच्यावर केलेले जुलूम ह्यांमुळे त्या देशांतील व गावांतील लोक तुला लुटतील. 9 ‘जो आपल्या घराण्यासाठी वाईट लाभ मिळवतो व त्याद्वारे अरीष्टांच्या हातातून सुटावे म्हणून आपले घरटे उंच स्थापितो, त्यास हाय हाय!’ 10 १० तू अनेक लोकांस मारलेस, त्यामुळे तू स्वत: च्या घरासाठी अप्रतिष्ठा तयार केली आहेस आणि आपल्या स्वत: च्या जिवा विरुद्ध पाप केले आहेस. 11 ११ भिंतीतील दगडसुध्दा तुझ्याविरुध्द ओरडतील आणि तुझ्या घराचे वासे त्यांना उत्तर देतील. 12 १२ ‘जो रक्ताने शहर बांधतो, आणि जो अन्यायाने गाव वसवितो त्यास हाय हाय!’ 13 १३ त्या लोकांनी उभारलेले सर्व आगीत भस्मसात होईल, आणि राष्ट्रे केवळ व्यर्थतेसाठी थकतील, हे सैन्याच्या परमेश्वरा कडून घडून आले नाही काय? 14 १४ तरीही जसे पाणी समुद्राला झाकते, तशी पृथ्वी परमेश्वराच्या गौरवाच्या ज्ञानाने भरेल. 15 १५ ‘जी व्यक्ती आपल्या शेजाऱ्याला मद्य प्यायला लावते त्यास हाय हाय! तू आपले विष त्यामध्ये घालून त्यास मस्त करतो,’ ह्यासाठी की त्याचे नग्नपण पाहावे. 16 १६ तू गौरवाने नाही तर अप्रतिष्ठेणे भरला आहेस! तू पण त्याची चव घे आणि आपली नग्नता प्रकट कर! परमेश्वराच्या उजव्या हातांतला प्याला तुझ्याकडे फिरत येईल, आणि तुझ्या सर्व गौरवावर अप्रतिष्ठा पसरवली जाईल. 17 १७ लबानोनावर केलेला जुलूम तुला झाकेल आणि पशूंचा केलेला नाश तुला भयभीत करील. कारण मनुष्याचा रक्तपात व तेथील भूमीवर, शहरांवर, आणि त्यातील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम ह्यांमुळे असे होईल. 18 १८ मूर्तीकाराने कोरून केलेल्या मुर्तिंमध्ये त्यास काय लाभ? कारण जो कोणी त्यास कोरतो, किंवा ओतीव मूर्ती तयार करतो, तो खोटा शिक्षक आहे, कारण तो जेव्हा अशा मुक्या देवांना बनवतो तेव्हा तो स्वतःच्या हस्तकृतीवर विश्वास ठेवतो, जेव्हा तो अशा मुक्या देवांना बनवतो. 19 १९ जो लाकडांच्या मूर्तीस म्हणतो जागा हो! किंवा दगडांच्या मूर्तीस म्हणतो ऊठ! त्यास हाय हाय! या वस्तू शिकवतील काय? पाहा! ते सोन्याने आणि चांदीने मढवले आहेत, पण त्यामध्ये मुळीच श्वास नाही. 20 २० परंतु परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरात आहे, सर्व पृथ्वी त्यापुढे स्तब्ध राहो!”

< हबक्कूक 2 >